आगामी राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिले आहेत. दोन महिन्यांत पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. २५ जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. त्यामुळे मी माझ्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मंत्रालयात आणि विभागांमध्ये नियुक्तीवर पाठवत आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांनी नेदरलँडमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राष्ट्रपतींचे प्रेस सचिव वेणु राजमणि यांच्यासाठी एक छोटेखानी निरोप समारंभाचे आयोजन केले होते. राजमणि हे पुढील महिन्यात नेदरलँडमध्ये पदभार स्वीकारणार आहेत. या समारंभात बोलताना राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत मुखर्जी यांनी दिले आहेत. जुलैमध्ये राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे. उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या जोरदार हालचाली राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुखर्जी यांनी दिलेले संकेत महत्त्वाचे मानले जातात.

सरकारच्या मनात असल्यास मुखर्जी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपतिपदाची संधी देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे संकेत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील विरोधी पक्षांनी दिले आहेत. मात्र, या पदासाठी कुणाला उमेदवारी दिली जाईल, हे अद्याप सरकारने स्पष्ट केलेले नाही. राष्ट्रपतिपदासाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सहमतीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रित केले आहे. त्यांनी अलिकडेच सोनियांची भेट घेतली होती. मुखर्जी यांना पुन्हा संधी दिली जावी, असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.