रामनाथ कोविंद यांच्या विरोधात काँग्रेसह डावे व तृणमूल; आज दिल्लीत बैठक

राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार उभा करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षांची गुरुवारी बैठक होत असतानाच, या मुद्दय़ावर बुधवारी विरोधी पक्षांमध्ये असलेले मतभेद स्पष्टपणे दिसून आले. रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरुद्ध उमेदवार ठरवण्याबाबत साम्यवादी विचारसरणीच्या पक्षांमध्ये फूट पडली असून, निवडणूक लढवण्याबाबत आग्रही असलेले काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल या पक्षांना फार कमी पक्षांचा पाठिंबा आहे.

नितीशकुमार यांचा जद (यू) आणि नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून जद (एस) आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल यांनीही असेच संकेत दिले आहेत. समाजवादी पक्ष व राजद हे मात्र लढतीच्या बाजूने आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल व राज्यसभतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याशी संपर्क साधून त्यांना २२ जूनच्या विरोधी पक्षांच्या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली. मात्र आपण काँग्रेसने कर्नाटकमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते दानिश अली यांना या बैठकीत हजर राहण्यास सांगितले आहे.

आम्ही आमची भूमिका उद्याच्या बैठकीत स्पष्ट करू, असे अली यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. मात्र, कोविंद हे दलित असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध करणे पक्षासाठी ‘कठीण’ झाले असल्याचे जद (एस) मधील एका सूत्राने सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री व राजदचे नेते जयप्रकाश यादव यांनीही आपल्या पक्षाची भूमिका उद्याच्या बैठकीत ठरेल, असे सांगितले. भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे खासदार दुष्यंत चौटाला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, की याबाबत विचार करण्यासाठी शुक्रवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अद्याप मुंबईत असल्याने दिल्लीत होणारी पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पक्ष आपली भूमिका गुरुवारी स्पष्ट करणार आहे. अद्याप याबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नसल्याचे पक्ष सरचिटणीस तारिक अन्वर यांनी सांगितले.