एनडीएचे राष्‍ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना संयुक्त जनता दलाने पाठिंबा दिल्याने बिहार सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू), राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) व काँग्रेस या पक्षाचे महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना राष्‍ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिल्याने मात्र आता महायुतीतच बेकी निर्माण झाल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे राजदप्रमूख लालूप्रसाद यादव भयंकर संतापले असून नितीश कुमार हे या देशाचे मालक नाहीत, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

सर्वात प्रथम नितीश कुमार यांनीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची भेट घेऊन धर्मनिरपेक्ष दलांनी एकत्र येऊन राष्‍ट्रपतीपदासाठी उमेदवार उभा करण्यासाठी सुचवलं होतं, आणि आता तेच बदललेत, अशी प्रतिक्रिया आरजेडीचे ज्येष्‍ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरूवारी दिली.

जेडीयूने विरोधकांमध्ये फूट पाडल्याचा आरोप त्यांनी केला. जेडीयूने वेगळा निर्णय घेऊन विरोधकांमधील एकता कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांना गैरसमज होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

आरजेडी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकजूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. नितीश कुमार यांच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले, नितीश कुमार देशाचे मालक आहेत का ? आरजेडीच्या प्रयत्नांमुळे धर्मनिरपेक्ष एकत्र येतील आणि राष्‍ट्रीय स्तरावर एक पर्याय तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.