माजी उपपंतप्रधान दिवंगत दलित नेते जगजीवन राम यांची मुलगी असलेल्या मीरा कुमार यांना यूपीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरूवारी जाहीर केले. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याविरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा राहिलेल्या मीरा कुमार आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभ्या आहेत. मीरा कुमार यांच्या उमेदवारीमुळे भाजपसमोरील अडचण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही नेते दलित कुटुंबातून येतात.

मीरा कुमार या लोकसभाध्यक्ष पद भूषवणाऱ्या पहिल्या दलित महिला होत्या. त्याचबरोबर बिहारमधून या पदावर विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या खासदार होत्या. त्या पाचवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. इंग्रजी साहित्यात पदव्यूत्तर पदवी केलेल्या मीरा कुमार यांचा जन्म १९४५ मध्ये पाटणा येथे झाला. दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालय व मिरांडा हाऊसमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कायद्यातून पदवी आणि इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९७३ मध्ये त्यांची भारतीय विदेश सेवेत (आयएफएस) निवड झाली. त्यानंतर त्यांनी स्पेन, ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले. परंतु, तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेशमधून सुरू केली. १९८५ मध्ये बिजनौर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी बसपच्या मायावती आणि दलित नेता रामविलास पासवान यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला होता. परंतु, नंतरच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी आपला मतदारसंघ बदलत दिल्लीच्या करोलबाग लोकसभा मतदारसंघातून पुन्हा संसदेत पोहोचल्या.

त्यानंतर मीरा कुमार यांनी आपले जन्मस्थळ असलेल्या बिहारला आपली कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या वडिलांचा मतदारसंघ सासारामची निवड त्यांनी केली. सासाराम लोकसभा मतदारसंघातून १९९८  आणि १९९९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. २००४ मध्ये पारडे बदलले आणि त्यांनी २, ५८,२६२ मताधिक्याने विजयी झाल्या. त्यावेळी त्यांनी केंद्रात सामाजिक न्याय मंत्रिपदही भूषवले.

१५ व्या लोकसभेतही त्या विजयी झाल्या. त्यावेळी त्यांना केंद्रात पदोन्नती देत जलसंधारण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर त्या लोकसभेच्या पहिल्या महिला व दलित समाजाच्या दुसऱ्या लोकसभाध्यक्ष बनल्या. त्यांच्यापूर्वी बालयोगी हे दलित समाजाचे लोकसभा अध्यक्ष होते.

त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस व काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांचे पती मंजुल कुमार हे सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात.