फ्रान्समध्ये अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे, पहिल्या टप्प्यात कडक सुरक्षेत मतदान होत असून या निवडणुकीवर युरोपीय समुदायाचे भवितव्यही ठरणार आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान मतदान झाले. त्यानंतर निकाल हाती येणे सुरू होईल. अति उजव्या नॅशनल फ्रंटच्या नेत्या मरिन ल पेन व मध्यममार्गी पक्षाचे नेते इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यातील  लढत चुरशीची असून अंतिम निकाल सात मे रोजी पुढच्या टप्प्यात लागेल. ही निवडणूक अतिशय चुरशीची व रंगतदार होत चालली आहे. ल पेन (वय ४८) या नॅशनल फ्रंटच्या नेत्या असून त्या देशातील सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करीत आहेत. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकानुनयाच्या लाटेवर स्वार होण्याचा ल पेन यांचा विचार आहे. फ्रान्सला युरोझोनमधून बाहेर काढण्याचा व युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा त्यांचा इरादा आहे. ल पेन यांचा विजय झाला, तर तो युरोपीय समुदायाला मोठा हादरा असेल कारण ब्रिटन आधीच समुदायातून बाहेर पडला आहे. मॅक्रॉन (वय ३९) हे निवडून आले तर फ्रान्सचे सर्वात तरुण अध्यक्ष असतील व ते युरोपीय समुदायाच्या बाजूने असून उद्योगमंचास अनुकूल आहेत. माजी बँकर असलेले मॅक्रॉन यांनी एन मार्ची (ऑन द मूव्ह) ही नवी चळवळ सुरू केली आहे. त्यात डावे नाही उजवे नाही अशी त्यांची भूमिका आहे. भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेले कॉन्झर्वेटिव्ह उमेदवार व माजी पंतप्रधान फ्रँकॉइस फिलॉन व कडवट डावे जीन ल्युक मेलेनशॉन हेही मैदानात असून त्यांचे आव्हान दुर्लक्षता येणार नाही. या निवडणुकीत ५० हजार पोलिस व ७ हजार सैनिक मतदारांच्या संरक्षणासाठी तैनात केले होते. गुरुवारी एका पोलिसावर आयसिसने हल्ला करून त्याला ठार केले होते.