देणग्यांच्या ओघाने केवळ दोन वर्षांत रक्कम सोळाशे कोटींवर

‘‘तुमच्यावरील हृदयशस्त्रक्रियेसाठी पन्नास हजार रुपये मंजूर करीत आहे. ते तुमच्या उपयोगी येतील, पण कायम लक्षात ठेवा, की हा समाजाचा पैसा आहे आणि म्हणून तुम्ही कायम समाजऋणात राहा. समाजकार्यामध्ये शक्य तितका खारीचा वाटा उचलत राहा..’’

कोल्हापूर जिल्ह्य़ातल्या; पण सांगली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या एका दूरवरच्या खेडय़ात राहणाऱ्या विजय मांढरे (नाव बदलले आहे) यांना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहीचे आलेले हे पत्र. पंतप्रधान नैसर्गिक मदतनिधीतून (पीएमएनआरएफ) हृदयशस्त्रक्रियेसाठी पन्नास हजार रुपये मंजूर केल्यानंतर मोदींनी मांढरे यांना हे पत्र पाठविले. हे पत्र तसे नेहमीसारखे; पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अशा आरोग्य उपचारांच्या मदतीचे प्रमाण जवळपास दुपटीपेक्षा अधिक वाढले आहे, कारण ‘पीएमएनआरएफ’मध्ये गेल्या तीन वर्षांपासून वाढलेला देणगीचा विलक्षण ओघ. केवळ मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये सुमारे १६१६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. तुलनाच करायची झाली, तर ही रक्कम ‘यूपीए-२’च्या पाच वर्षांमध्ये (२००९-१४) जमा झालेल्या देणग्यांपेक्षाही अधिक आहे. देणग्यांची रक्कम वेगाने फुगल्याने आपदग्रस्त व शस्त्रक्रियांसाठीचा मदतनिधीही गेल्या दोन वर्षांत तब्बल साडेनऊशे कोटींवर गेला आहे. त्यापूर्वीच्या संपूर्ण पाच वर्षांमध्येसुद्धा एवढय़ा मदतनिधीचे वाटप झालेले नाही आणि एवढे वाटप करूनही ‘पीएमएनआरएफ’कडे सध्या २,६७५ कोटी शिल्लक आहेत. म्हणजे गेल्या पाच वर्षांत शिलकीमध्ये सुमारे एक हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.

देणग्यांचा ओघ एकाएकी वाढण्याच्या कारणाबाबत पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकाऱ्यास विचारले असता, त्याने त्याचे श्रेय मोदींच्या लोकप्रियतेबरोबर आक्रमक जाहिरातींना दिले. ‘केंद्राच्या कोणत्याही मंत्रालयाच्या वेबसाइटवर जा. पीएमएनआरएफची जाहिरात ठळकपणे पुढे येईल. जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे या निधीची जाहिरात केली जाते. ट्विटरवरही तिचे अस्तित्व असते. यापूर्वी असा आवर्जून आग्रह धरण्यात येत नव्हता,’ याकडे त्या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थीच्या मदतीसाठी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी या निधीची स्थापना केली होती. त्यानंतर हा निधी भूकंप, महापूर, चक्रीवादळ, त्सुनामी, दरडी कोसळणे, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि अपघातग्रस्तांसाठी वापरला जात आहे.