पंतप्रधानांचे मौनच काँग्रेसला भोवले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग हे संवाद साधण्यात अपयशी ठरले असून, याचा फटका यूपीए सरकारला बसला आहे. पंतप्रधानांनी कायम मौन बाळगल्यामुळेच परिस्थिती आणखी खालावली अशी टिका काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मनमोहनसिंग यांच्यावर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पन्नाशीही गाठता आलेला नाही. काँग्रेसच्या या दारुण पराभवासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र पक्षाचे नेते व छिंदवाडा येथून निवडून आलेले कमलनाथ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत पराभवाचे खापर पंतप्रधानांवर फोडले आहे. ‘पक्षाला आपल्या रणनितीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. पक्षाचा राजकीय दृष्टीकोन हा मागासलेला असून पक्षात नव्याने प्राण फुंकण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. कमलनाथ यांनी पराभवासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पराभवाला जबाबदार ठरवले असले तरी सरकारी योजना मात्र योग्यच होत्या असे त्यांनी स्पष्ट केले.
‘राहुल गांधी यांच्याकडे शेवटच्या आठ महिन्यांमध्ये प्रचाराची धूरा देण्यात आली.  त्यांचा सरकारच्या प्रदर्शन आणि उपलब्धींशी संबंध येत नाही या दाव्यात तथ्य नाही’ असे सांगत कमलनाथ यांनी राहुल गांधींची पाठराखण केली. पक्षाने ब्लॉकस्तरावर पुन्हा एकदा नव्याने बांधणी करण्याची गरजही कमलनाथ यांनी व्यक्त केली.