जपानसोबत होणाऱ्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जपानची राजधानी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत़  या बैठकीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी या वेळी व्यक्त केली़. 
क्योटो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समपदस्थ शिन्झो अ‍ॅबे यांची भेट झाली. तेथील प्राचीन बौद्ध मंदिरे पाहताना उभय नेत्यांनी काही वेळ एकत्र व्यतीत केला. दरम्यान नरेंद्र मोदी यांचे टोकियो येथे आगमन झाले आहे.
जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी सांगितले, की टोकियो येथे होणाऱ्या शिखर बैठकीबाबत आपल्याला उत्सुकता आहे. त्यांनी ट्विटवर म्हटले आहे, की भारत-जपान यांच्यातील संबंध ऐतिहासिक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जपानची प्राचीन राजधानी असलेल्या क्योटो शहराच्या सांस्कृतिक वारशाबाबत जे स्वारस्य दाखवले, त्याबाबत आपल्याला अधिक आनंद वाटतो, मोदी यांच्यासमवेत आपण टोजी मंदिराला सकाळी भेट दिली, तेथील बुद्धाचे पुतळे बघताना आम्हाला जपान व भारत यांचे नाते समजले. मोदी यांच्याबरोबर आपण भोजन घेतले. तो कार्यक्रमही आनंददायी होता. क्योटो शहराच्या ऐतिहासिक वारशाचे मोदी यांनी कौतुक केले, क्योटो शहरात दोन हजार मंदिरे व स्मारके आहेत, नारा काळापासून या शहराला महत्त्व आले. क्योटो ही जपानची १००० वर्षे राजधानी होती. त्यानंतर जपानचे सम्राट टोकियोला आले. पंतप्रधान मोदी यांचे आपण खुल्या दिलाने स्वागत केले, त्यांच्याबरोबर भोजन घेण्याचा आनंदही वेगळाच होता. या वेळी आम्ही मतांचे आदानप्रदान केले.
 त्यात उद्या टोकियोत होणाऱ्या शिखर बैठकीची पूर्वतयारीही झाली होती. भारताच्या प्रगतीसाठी जपानला फार मोठे महत्त्व आहे, आपल्या दौऱ्याने या दोन्ही देशांत नवीन अध्याय सुरू होत आहे.

कमळ पाहून मोदी हरखून गेले
जपान दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्योटो येथील टोजी मंदिराला भेट दिली, त्या वेळी त्यांना तिथे गौतम बुद्धाच्या उभ्या पुतळ्याला कमळ लावलेले दिसले, भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ पाहून पंतप्रधान मोदी हरखून गेले.
प्राचीन मंदिरांच्या भेटी प्रसंगी जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे हे मोदी यांच्या समवेत होते. तेथील कमळाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न अ‍ॅबे यांनी केला. त्या वेळी मोदी यांनी सांगितले, की कमळाचे महत्त्व आपल्याला माहीत आहे कारण ते आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे, त्यावर दोघेही खळखळून हसले.
मोदी यांनी त्यावर फारसे स्पष्टीकरण केले नाही पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी कमळाची जाहिरात करण्यात कुठलीही कमतरता ठेवली नव्हती. शेवटी भाजपला या निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले होते.