पाकिस्तानला भारतासोबत चर्चा हवी आहे तर, दहशतवादापासून दूर राहावे लागेल, अशा कडक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. जे लोक हिंसा आणि दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांना आम्ही नेस्तनाभूत केले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. नवी दिल्लीत आज, मंगळवारी ‘रायसीना डायलॉग’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की “२०१४ मध्ये लोकांनी परिवर्तनासाठी आमच्या सरकारला संधी दिली. विविध कारणांमुळे जगात मोठे बदल होत आहेत. वैश्विक बदलांबरोबरच अनेक आव्हाने आहेत.” आम्ही भारताला पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंधांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केवळ आपल्या फायदा बघणे हे आमच्या स्वभावात नाही. ‘सबका साथ, सबका विकास’ हे केवळ भारतासाठी नाही तर, संपूर्ण जगासाठी आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

गेल्या अडिच वर्षांत आम्ही शांततेसाठी काम केले आहे. उदाहरण म्हणून अफगाणिस्तानकडे पाहता येईल. भारत आणि अफगाणिस्तानमधील मजबूत संबंधांसाठी केलेले प्रयत्न हे त्याचे द्योतक आहे, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. मी लाहोरलाही गेलो होतो. मात्र, शांततेच्या मार्गावर एकटा चालूच शकत नाही, असे म्हणून मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. शेजारी देशाशी चांगले संबंध ठेवण्याचे माझे प्रयत्न आहेत. पंतप्रधानपदाच्या शपथग्रहण सोहळ्याला आम्ही पाकिस्तानसह सार्क देशांनाही आमंत्रित केले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. शांतता आणि चर्चेच्या मुद्द्यावर पाकिस्तान वारंवार दर्पोक्ती करत आहे. त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असल्यास त्यांना दहशवादापासून दूर राहायला हवे, अशा शब्दांतही पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावले. जे लोक हिंसा आणि दहशतवादाला खतपाणी घालतात, त्यांना आम्ही नेस्तनाभूत करण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.