पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ते शनिवारी पोर्तुगालमध्ये पोहोचले. त्यानंतर ते अमेरिका आणि नेदरलँडच्या दौऱ्यावर जातील. पंतप्रधान पोर्तुगालच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यानंतर ते अमेरिका आणि नेदरलँड येथेही जातील, असं ट्विट पंतप्रधान कार्यालयानं केलं आहे. पंतप्रधान मोदी २६ जूनला अमेरिकेच्या दौऱ्यावरही जातील. तर २७ जूनला ते नेदरलँडला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गोपाल बागले यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ट्रम्प हे अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मोदी पहिल्यांदाच ट्रम्प यांची भेट घेतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेत पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. तेथे व्हाईट हाऊसमध्ये ते ट्रम्प यांच्यासोबत डिनर घेतील. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर घेणारे नरेंद्र मोदी हे जगातील पहिलेच नेते ठरणार आहेत. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी मोदी लिस्बनमध्ये भारतीय वंशाचे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान पोर्तुगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तीन देशांच्या दौऱ्यावरील अंतिम टप्प्यात मोदी नेदरलँडलाही जाणार आहेत. हेगमध्ये ते मार्क रट यांची भेट घेऊन चर्चा करतील.

व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी जगातील पहिलेच नेते आहेत. ट्रम्प आणि मोदी भेट महत्त्वाची ठरणार आहे. हे दोन्ही नेते दहशतवाद, एच १ बी व्हिसा यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षणासंबंधी मुद्द्यांवरही चर्चा होईल.