पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिनाभरात तिसऱ्यांदा गुजरातच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्याची द्वारकामधून सुरूवात झाली. द्वारकाधीश मंदिरातून निघत असताना सर्वांना आश्चर्यचकित करणारी घटना घडली. मोदींची नजर त्यांच्या एका जुन्या मित्रावर पडली. मोदींनी लगेचच आपला ताफा थांबवून आवर्जून आपल्या जुन्या मित्राची भेट घेऊन त्यांची ख्यालीखुशाली विचारली.

हरिभाई हे मोदींचे जुने मित्र आहेत. ते ५२ वर्षांपासून संघाशी जोडले गेले आहेत. मोदींबरोबर त्यांची घनिष्ठ मैत्री आहे. संघाचं काम करताना मोदी आणि हरिभाई हे एकाच खोलीत राहत होते, असे सांगण्यात येते. शनिवारी मोदी आणि हरिभाई यांच्या भेटीचे छायाचित्र समोर आले. यामध्ये मोदी मोठ्या आत्मियतेने आपल्या मित्राची भेट घेताना दिसत आहेत. पंतप्रधानांना माझ्या पत्नीचे निधन झाल्याचं माहीत होतं. त्यांनी माझ्याकडे शोक व्यक्त केला, असे हरिभाई म्हणाले.

तत्पूर्वी, मोदींच्या हस्ते ओखा आणि बेट द्वारका दरम्यानच्या पुलाचा शिलान्यास करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही त्यांच्यासमवेत होते. त्यापूर्वी सकाळी पंतप्रधानांनी द्वारकाधीश मंदिरात पुजा केली. पुजेनंतर त्यांनी मंदिर परिसरातील लोकांची भेटी घेतली. या वेळी मुख्यमंत्री विजय रूपानी हेही बरोबर होते. पश्चिम गुजरातमध्ये असलेले हे मंदिर सुमारे २५०० वर्षे जुने आहे.