नोटाबंदीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ससंदेत स्पष्टीकरण द्यावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी संसदेतील कामकाज रोखून धरले आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी ट्विटरवरून नोटाबंदीबाबत आपली भूमिका मांडत नागरिकांना या निर्णयाचे समर्थन करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या या लढ्यात सहभागी झालेल्या नागरिकांना मी सलाम करतो. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी, व्यापारी, कामगारांना सरकारच्या निर्णयामुळे खूप त्रास होत आहे.

परंतु लोकांना आता होणारा हा त्रास अल्प काळासाठी असेल पण भविष्यातील दीर्घ काळासाठी मोठा फायदेशीर ठरणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.
ते म्हणाले, ग्रामीण भागाच्या प्रगतीचा रथ भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखू शकणार नाही. कॅशलेस अर्थव्यवस्था बनवण्याची आपल्याला मोठी संधी आहे. कॅशलेस आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या अर्थव्यवस्थेस उभारी देऊ असे आवाहनही त्यांनी केले. माझ्या युवक मित्रांनो भ्रष्टाचारमुक्त आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेचे तुम्हीच वाहक आहात. आपण एकत्रितपणे काळ्या पैशाविरोधात लढा देऊ या. देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि आपल्या पुढच्या पिढीला शक्तीशाली बनवण्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा बोल्ड नव्हे तर मूर्खपणाचा आहे, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. तर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जाहीर वाभाडे काढले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दहशतवाद संपेल, असा दावा भाजपकडून करण्यात येतो. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर देशातील दहशतवाद किंवा काळ्या धनाची निर्मिती खरोखरच थांबली आहे का?, असा सवाल करत उद्धव यांनी सरकारला घरचा आहेर दिला. नोटीबंदीमुळे दहशतवाद संपणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला नवा मार्ग दाखवला आहे. जगातील सर्व देशांनी नोटाबंदीची अंमलबजावणी करून दहशतवाद कायमचा संपवला पाहिजे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.