भाजपला केंद्रात सत्तेवर येऊन लवकरच अडीच वर्षे पूर्ण होतील. या पार्श्वभूमीवर विविध मंत्रालयातून या कालावधीत केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक बनवण्यात येत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रगती पुस्तकांत स्वारस्य दिसत नाही. प्रगती पुस्तकांऐवजी विविध विभागांनी बदल घडवण्यासाठी काय प्रयत्न केले हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी आणलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे विविध विभागातील सचिव आता असा अहवाल तयार करण्यात गुंतले आहेत.
नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींसमोर आयोगाच्या प्रगतीचे सुमारे १८० स्लाईडसचे सादरीकरण केले. या सादरीकरणात मागील तीन अंदाजपत्रकांमध्ये केलेल्या विविध योजना आणि घोषणांच्या प्रगतीचा अहवाल सादर केला होता. त्यावेळी सादरीकरण सुरू असतानाच मध्येच रोखत मोदींनी आपल्याला या प्रगती पुस्तकात काहीही स्वारस्य नसून मंत्रालयांनी बदल घडवण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलत आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यानंतर लगेचच विविध विभागातील सचिवांनी पंतप्रधानांच्या सूचनेवर अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा करून त्याचा अहवाल तयार केला. मोदी यांनी मागील शुक्रवारी (दि. २६) मंत्रिमंडळाबरोबर बैठक घेतली. या वेळी त्यांनी आपल्या प्रगती पुस्तकाऐवजी बदल घडवण्यासाठी काय प्रयत्न केले हे जाणून घ्यायचे असल्याचे सांगितले होते. तत्पूर्वी मोदींनी सचिवांची बैठक घेऊन त्यांना त्यांच्या पहिल्या पोस्टिंगच्या ठिकाणी जाण्यास सांगितले आणि काय बदल दिसले याचा अहवाल देण्यास सांगितले. सर्व सचिवांनी तसा अहवाल दिल्यानंतर एक समिती स्थापण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या सूचनांच्या आधारे कृती आराखड्यात बदलावर भर देण्यात आला आहे.