हाफिज सईदमुळे पाकिस्तानला धोका आहे असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटल्यामुळे विरोधी पक्षाचे नेते त्यांच्यावर नाराज झाले आहेत. संरक्षण मंत्र्यांनी हे विसरू नये ते भारताचे संरक्षण मंत्री नाहीत तर ते पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत, या शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी हाफिज सईद दहशतवादी आहे असे म्हटले. त्याला नजरकैद झाली ती देशाच्याच हिताची आहे असे त्यांनी म्हटले. सईदमुळे देशाला धोका असल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्यामुळे त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्याच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत असे असिफ यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. इम्रान खानच्या तेहरीक ए इंसाफ या पक्षातील एका नेत्याने असिफ यांच्यावर टीका केली.

असिफ यांच्या बोलण्यावरुन तर असे वाटत आहे की ते भारताचे प्रवक्ते आहेत, अशी टीका मेहमुदूर रशीद यांनी केली. भारत आणि अमेरिकेचा विषय जेव्हा येतो तेव्हा पाकिस्तान नेहमी मृदू धोरणाचा अवलंब करतो असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पाकिस्तान तेहरीक ए इंसाफ या पक्षाची स्थापना केली आहे. गेल्या काही वर्षांपासून या पक्षाने पाकिस्तानच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पाकिस्तानच्या नवनिर्मितीचे स्वप्न घेऊन जन्मलेल्या या पक्षाने नेहमीच भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा विरोध केला आहे. परंतु त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने हे विधान केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आझाद काश्मीर सरदार मोहम्मद आतिक यांनी देखील असिफ यांच्यावर टीका केली. असिफ यांचे विधान हे भारताला खुश करण्यासाठी आहे असे ते म्हणाले. तर पाकिस्तानचे संरक्षण समितीचे अध्यक्ष मौलाना सामिउल हक यांनी म्हटले असिफ यांनी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये काय अत्याचार होतात हे सांगणे अपेक्षित आहे तर उलट ते सईद सारख्या व्यक्तीला दहशतवादी म्हणत आहेत. सईदची संघटना जमात उद दवातर्फे या विधानाचा निषेध करण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी असिफ यांची कानउघडणी करावी असे त्यांनी म्हटले आहे.