अमेरिकेच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) विकसित केलेल्या प्रक्षेपकांना तेथील खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी विरोध दर्शविला आहे. इस्रो कमी खर्चात प्रक्षेपकांची निर्मिती करत असल्याने आगामी काळात आम्हाला याचा मोठा फटका बसेल, अशी भीती अमेरिकेतील खासगी कंपन्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या खासगी कंपन्यांनी एकत्र येऊन इस्रोच्या उपकरणांना विरोध दर्शविण्यास सुरूवात केली आहे.
कमी खर्चात अवकाश प्रक्षेपण करणाऱया इस्रोशी स्पर्धा करणे कठीण असल्याचे मत या उद्योजकांनी अमेरिकी काँग्रेस समितीसमोर व्यक्त केले. इस्रोला भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत असल्याचा आरोप देखील अमेरिकी कंपन्यांकडून करण्यात आला आहे.
भारतासारख्या लोकशाही देशाकडे होत असलेले तंत्रज्ञान हस्तांतरण हा काळजीचा विषय नाही. मात्र, तेथील सरकारकडून इस्रोला अनुदान मिळत असल्याने या क्षेत्रातील इतर कंपन्यांना मोठा फटका बसत आहे, ही चिंतेची बाब आहे, असे स्पेस फाऊंडेशन कंपनीचे सीईओ एलियट पुल्हॅम म्हणाले.