उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाशी आघाडी केल्यानंतर काँग्रेसने आपल्या राजकीय हालचाली तीव्र केलया आहेत. काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्याची चर्चा करत आहेत. काही नेत्यांच्या मते प्रियंका यांनी ज्यापद्धतीने उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सांभाळली यावरून त्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा बनू शकतात. सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून त्या निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. प्रियंका गांधींमुळेच समाजवादी पक्षाबरोबर आघाडी झाल्याचे सोमवारी (दि. २३) काँग्रेसने अधिकृतरित्या म्हटले होते. आतापर्यंत काँग्रेसचे नेते प्रियंका यांच्या सक्रिय राजकरणात येण्यावरून चर्चा करण्यास टाळत होते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्तरावरील राजकारणात त्यांना येण्याची मागणी सातत्याने होत आली आहे.

सोनिया गांधी यांनी आपली पहिली निवडणूक १९९९ मध्ये अमेठीतून लढली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्या रायबरेली मतदारसंघात गेल्या व अमेठी मतदारसंघ राहुल गांधी यांना देण्यात आला. हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबीयांचा गड मानला जातो. आई सोनिया गांधी व भाऊ राहुल यांच्या निवडणुकीची धुरा प्रियंका आपल्याच हाती घेत असतात. प्रियंका या रायबरेलीतूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्याची शक्यता आहे. इंदिरा गांधीही याच मतदारसंघातून निवडणूक लढत होत्या. प्रियंका यांची नेहमी इंदिरा गांधींशी तुलना केली जाते.
काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर अनेक बदल होतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. येत्या काही दिवसांत राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल केली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत त्यांनी बैठकीचे नेतृत्व केले होते. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी तयारीसाठी दोन वर्ष मिळावा यासाठी नवी टीम तयार केली जाईल. प्रियंका राजकारणात सक्रिय झाल्या तर पक्ष संघटनेची त्यांना जबाबदारी सांभाळू शकतात.