आपल्या पतीवर होणाऱया टीकेचा समाचार घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी बुधवारी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. जर तुम्ही महिलांच्या सक्षमीकरणाच्या गप्पा मारत आहात, तर त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम करू नका, या शब्दांत प्रियांका गांधींनी मोदींवर टीका केली. त्याचबरोबर देशाची सत्ता एका व्यक्तीच्या हातात सोपविणे योग्य आहे की देशातील नागरिकांच्या हातात असणे योग्य, असाही प्रश्न त्यांनी विचारला.
प्रियांका गांधी आपली आई सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी रायबरेलीमध्ये आहेत. यावेळी जाहीर सभा आणि पत्रकारांशी साधलेल्या संवादातून मोदींवर टीका केली. निवडणूक प्रचाराच्या काळात विरोधकांवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा खरे प्रश्न काय आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या चर्चांमधून एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यात येत असल्याचे दिसते. मात्र, हे राजकारण नाही. केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठीच अशा स्वरुपाची वैयक्तिक टीका करण्यात येत असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या.