दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत दिले असतानाच त्यांच्या राजकीय प्रवेशाला विरोधही सुरु झाला आहे. एका तामिळ संघटनेने रजनीकांत यांचा पुतळा जाळत त्यांचा विरोध दर्शवला आहे. कन्नडिगांना तामिळनाडूतील राजकारणात स्थान नाही असे या संघटनेचे म्हणणे असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रजनीकांत यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. तामिळनाडूतील कोदमबक्कम परिसरात आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांतने राजकीय प्रवेशावर सूचक विधान केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. रजनीकांत हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील अशी चर्चा आहे. मात्र राजकारणात एंट्री करण्यापूर्वीच रजनीकांत यांना विरोधही सुरु झाला आहे.

तामिळनाडूतील तामिळ संघटनेने रजनीकांत यांच्या कर्नाटक कनेक्शनवर आक्षेप घेतला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रजनीकांत यांचा पुतळा जाळला. रजनीकांत यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलनाचा प्रयत्न हाणून पाडला.

काय आहे वाद ?
रजनीकांत हे तामिळनाडू राहत असले तरी त्यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला. शिवाजीराव गायकवाड हे त्यांचे खरे नाव आहे. रजनीकांत यांचे कुटुंबीय कर्नाटकमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर रजनीकांत तामिळनाडूत गेले होते. चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांत यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. ‘मी २३ वर्ष कर्नाटकमध्ये असल्याने कन्नडिगा होतो. पण त्यानंतर ४३ वर्षांपासून मी तामिळनाडूत असल्याने आता मी तामिझन (शुद्ध तामिळ) आहे’ असे रजनीकांत यांनी म्हटले होते. पण तामिळ संघटनांना रजनीकांत यांचे स्पष्टीकरण भावलेले नाही. रजनीकांत हे परप्रांतीय असून त्यांना तामिळनाडूतील राजकारणात स्थान नाही असे या तामिळ समर्थकांचे म्हणणे आहे.