या अभियंत्यांनी स्त्रियांसाठी एका खास अंतर्वस्त्राची निर्मिती केली असून, त्यात एखाद्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला तर त्याची सूचना तिचा पती, आईवडील किंवा पोलीस यांना मिळू शकेल. एवढेच नव्हे तर अमानुष कृत्य करू धजावणाऱ्या व्यक्तीला ३८०० किलो व्होल्टच्या लहरींचा धक्का बसेल. या अंतर्वस्त्रात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) व ग्लोबल सिस्टीम ऑफ मोबाइल कम्युनिकेशन (जीएसएम) असून दाब संवेदकही लावलेले आहेत.
सोसायटी हार्नेसिंग इक्विपमेंट (शी) या अंतर्वस्त्र उत्पादनाच्या निर्मात्या मनीषा मोहन या आहेत. त्यात आपल्या मुलीशी गैरवर्तन होत असल्याची सूचना मुलीच्या आईवडिलांना मिळते. त्याचबरोबर  ८२ वेळा विशिष्ट लहरींचे धक्के बसतात. बस, सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी स्त्रियांवर जे लैंगिक हल्ले केले जातात, त्याला आळा घालण्यासाठी हे अंतर्वस्त्र तयार केले आहे.
हे कसे घडेल?
जर कुणी एखाद्या मुलीचा विनयभंग किंवा  लगट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शॉक बसेल, कारण त्याने तिला स्पर्श करताना दाब संवेदकाकडून अशा लहरी सोडण्याची सूचना दिली जाईल. जीपीएस व जीएसएम मोडय़ुल्समुळे कुणी एखाद्या मुलीशी गैरवर्तन केल्यास आपोआप १०० नंबरला व तिच्या आईवडिलांना एसएमएस जाईल. मोहन या चेन्नई येथील श्री रामस्वामी मेमोरियल युनिव्हर्सिटीच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी त्यांच्या सहकारी रिम्पी त्रिपाठी व नीलाद्री बालू पाल यांच्या सहकार्याने हे अंतर्वस्त्र तयार केले आहे. त्याचे पूर्वरूप एसएचई (शी) या नावाने तयार केले असून, या उत्पादनाला लवकरच अंतिम रूप दिले जाईल. गांधीवादी तरुण तंत्रज्ञान पुरस्कार २०१३ या अंतर्वस्त्राला मिळाला आहे. हा पुरस्कार अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने दिला जातो.  
कल्पना कशी सुचली?
 दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर व बंगलोर येथील बीपीओ महिला कर्मचाऱ्यावरील बलात्कारानंतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करावेसे वाटले. महिलांच्या संरक्षणासाठी आणखी अभिनव कल्पना पुढे आणण्याचा आमचा विचार आहे. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव त्या वेठीस धरल्या जाऊ नयेत असे आम्हाला वाटते.     –  मनीषा मोहन