२०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्यादृष्टीने नितीशकुमार यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रतिमानिर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संयुक्त जनता दलाने ( जेडीयू)  बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांना मोदींप्रमाणेच विकासपुरूष म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी पद्धतशीरपणे पावले टाकायला सुरूवात केलीय. यापूर्वी भाजपनेही २०१९ मधील निवडणुकांच्यादृष्टीने नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यशदेखील संपादन केले होते.

भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी उभारण्याच्या पर्यायावर अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्त्व कोण करणार, याबाबत एकमत नसल्याने ही आघाडी अद्यापपर्यंत प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. मात्र, अगदी अशी वेळ आलीच तर या आघाडीचे नेते म्हणून नितीशकुमार यांच्या नावाला अनेकजणांकडून पसंती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून नितीशकुमार यांना प्रोजेक्ट करायला सुरूवात केली आहे. नितीशकुमार यांचा चेहरा आणि नेतृत्त्व सर्व स्तरातून स्विकारला जाणारा असल्याने त्यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन संयुक्त जनता दलाने केले आहे. नितीशकुमार हे दुरदृष्टी असलेले आणि विकास पुरूष असल्याने त्यांना देशातील जनता पंतप्रधान म्हणून स्विकारेल, असे संयुक्त जनता दलाच्या प्रवक्त्या भारती मेहता यांनी सांगितले.

२०१९ लोकसभा निवडणूकही भाजपला सोपी?

दरम्यान, नितीशकुमारांच्या प्रतिमा निर्मितीच्या रणनीतीचा भाग म्हणून मोदींच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेला पर्यायी घोषणा तयार करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश यांनी महिला सबलीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. ‘ सात निश्चय’ ही घोषणा देऊन नितीश यांनी बिहारमध्ये विकास घडवून आणला होता. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मोदींच्या सबका ‘साथ सबका विकास’ला ‘सात निश्चय’ टक्कर देऊ शकेल, असा विश्वास भारती मेहता यांनी व्यक्त केला.