दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मरण पावलेली आपली बहीण वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर वाचू शकली असती. वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने ज्या गुंतागुंती निर्माण झाल्या त्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी खंत तिच्या भावाने व्यक्त केली आहे.
मेडवारा काला या खेडय़ात वास्तव्यास असलेल्या तिच्या भावाने सांगितले की, ही घटना घडल्यानंतर आपण रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे मदतीची याचना केली पण कुणीही धावून आले नाही, जेव्हा महामार्ग गस्ती पथकाने सतर्क केल्यानंतर पोलीस तिथे आले, त्यात किमान दोन तास गेले आपल्या बहिणीने मृत्यूपूर्वी आपल्याशी संवाद करताना म्हटले होते.
तोपर्यंत तिच्या शरीरातून बरेच रक्त गेले होते, आजूबाजूने जाणाऱ्या लोकांनी मदत केली असती तर तिला वैद्यकीय मदत वेळेवर मिळून ती वाचू शकली असती असे सांगून तो म्हणाला की, लोकांनी त्यांचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे व मदतीसाठी तत्पर असले पाहिजे. बलात्काराच्या प्रकरणात गुन्हेगारांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यावर केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिनिधींमध्ये मतैक्य होऊ शकले नाही ही खेदाची बाब आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईल अशी आम्हाला आशा आहे. बहिणीविषयी सांगताना तो म्हणाला की, तिला चित्रपटांची आवड होती, ती आमीरखानची चाहती होती. आम्हा भावांबरोबर तिने तलाश हा शेवटचा चित्रपट पाहिला.