राज्यातील २३ महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव

देशातील १२२ खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ती टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षीपासून मांडला आहे. ही बहुतांश महाविद्यालये महाराष्ट्र, गुजरात व हरयाणातील आहेत.

जर एखादे महाविद्यालय टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा प्रस्ताव शैक्षणिक वर्षांत मांडला असेल तर त्या संस्था नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाहीत पण आधीच्या काळातील विद्यार्थी त्यांना पदवी मिळेपर्यंत अभ्यास सुरू ठेवू शकतात.

आकडेवारीनुसार पुणे, नागपूर, औरंगाबाद, जळगाव व कोल्हापूर तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातील संस्थांनी २०१६-१७ या वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू ठेवणे शक्य नसल्याने ती एकतर बंद करावी लागत आहेत किंवा त्यांचे रूपांतर बहुतंत्रनिकेतन तसेच विज्ञान व कला महाविद्यालयात केले जात आहे. एआयसीटीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चांगले विद्यार्थी आयआयटी, एनआयटीसारख्या किंवा कें द्र अनुदानित संस्थांत प्रवेश घेतात व उरलेले खासगी महाविद्यालयात येतात व कमी विद्यार्थी असल्याने महाविद्यालये चालवणे अवघड जाते. गुजरात (१५), तेलंगण (७), कर्नाटक (११), उत्तर प्रदेश (१२), पंजाब (६), राजस्थान (११) व हरयाणा (१३) याप्रमाणे अनेक संस्थांनी महाविद्यालये बंद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दिल्लीतील एक तंत्र महाविद्यालय बंद करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील २३ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.