‘समान श्रेणी- समान निवृत्तिवेतन’ या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या माजी सैनिकांनी १९६५ सालच्या युद्धाच्या सुवर्णजयंती समारंभावर शुक्रवारी बहिष्कार घातला. हा गुंतागुंतीचा मुद्दा सोडवण्यासाठी सरकारने अलीकडेच दिलेला प्रस्तावही ७५ दिवसांपूर्वी विरोध सुरू केलेल्या आंदोलनकर्त्यांनी फेटाळून लावला आहे.
सरकारने अंतिमत: जे काही देऊ केले आहे, ते आम्हाला मान्य नाही. काल आम्हाला जे काही सांगण्यात आले, ते आमच्या मागणीबाबत संसदेने ठरवलेल्या व मान्य केलेल्या व्याख्येच्या जवळपासही जाणारे नाही, असे इंडियन एक्स-सव्‍‌र्हिसमेन मूव्हमेंटचे अध्यक्ष निवृत्त मेजर जनरल सतबीरसिंग यांनी सांगितले.
सेवानिवृत्तिवेतनात दरवर्षी वाढ करण्याऐवजी ते दर पाच वर्षांनी वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव माजी सैनिकांनी फेटाळून लावला आहे, कारण यामुळे ‘समान श्रेणी- समान निवृत्तिवेतन’ या संकल्पनेची व्याख्याच मोडीत निघेल, असे सतबीर म्हणाले.
आमच्या मागणीनुसार निवृत्तिवेतन लागू करण्यासाठी आधार वर्ष २०१३-१४ हे असावे आणि त्यानुसार वेतन १ एप्रिल २०१४ पासून मिळावे, या भूमिकेवरही आम्ही ठाम आहोत. आमच्या मागणीचा मुद्दा सातव्या वेतन आयोगाच्या हवाली करू नये, तर तिची व्याख्या संसदेने स्वीकारल्यानुसारच असावी, यावर सतबीर यांनी भर दिला.
‘समान श्रेणी- समान निवृत्तिवेतन’ लागू करण्यासाठी आधार वर्ष २०११ हे असावे, असा सरकारचा आग्रह असून, त्यात दर वर्षी ३ टक्के वाढ होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. निवृत्तिवेतन १ एप्रिल २०१५ पासून सुरू करण्याची सरकारची इच्छा असली, तरी माजी सैनिकांनी ती अमान्य केली आहे.
‘समान श्रेणी- समान निवृत्तिवेतन’ या मागणीसाठी मुदत निश्चित करण्यात सरकार अतिशय विलंब लावत असल्याने नाराज असलेल्या माजी सैनिकांनी १९६५ साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या सुवर्णजयंती कार्यक्रमांवर बहिष्कार घातला.