आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अवकाश प्रक्षेपक तळावरून भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाच्या (पीएसएलव्ही) साहाय्याने पाच विदेशी उपग्रह १० जुलै रोजी अंतराळात पाठवले जाणार आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि त्याची व्यावसायिक शाखा असलेले ‘अँट्रिक्स’ यांनी हाती घेतलेली ही आतापर्यंतची सगळ्यात ‘वजनदार’ व्यावसायिक मोहीम आहे.
या पाच उपग्रहांचे उड्डाण करतेवेळीचे एकूण वस्तुमान सुमारे १४४० किलोग्रॅम असून, अँट्रिक्स/ इस्रो यांनी आजवर हाती घेतलेल्या मोहिमांपैकी ही सगळ्यात जास्त वजनाची मोहीम असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
ब्रिटनच्या सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लि. (एसएसटीएल) ने तयार केलेले तीन एकसारखे डीएमसी-३ प्रकाशीय पृथ्वी निरीक्षक उपग्रह पीएसएलव्ही-२८ हे प्रक्षेपक यान आपल्या तेराव्या उड्डाणात अवकाशात पाठवेल. या तीन उपग्रहांचे वजन प्रत्येकी ४४७ किलोग्रॅम आहे.
याशिवाय, ब्रिटनमधील दोन सहायक उपग्रहदेखील पीएसएलव्ही-२८ वाहून नेणार आहे. प्रत्येकी ३ मीटर उंचीचे तीन डीएमसी-३ प्रक्षेपक पीएसएलव्हीच्या सध्याच्या वजनक्षमतेमध्ये वाहून नेणे हे एक आव्हान होते, असे इस्रोने त्यांच्या संकेतस्थळावर सांगितले.
ब्रिटनच्या एसएसटीएलच्या मालकीची उपकंपनी असलेली डीएमसी इंटरनॅशनल इमेजिंग आणि भारताची अँट्रिक्स कॉर्पोरेशन लि. यांच्यात झालेल्या करारानुसार हे आंतरराष्ट्रीय ग्राहक उपग्रह (कस्टमर सॅटेलाईट्स) अवकाशाच्या पृथ्वीजवळच्या कक्षेत पाठवण्यात येत आहेत.
हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कुठल्याही लक्ष्याची दररोज छायाचित्रे घेऊ शकतील.