पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मुखवटा घातलेल्या मंडळींचा फोटो शेअर करणे  ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पीटीआय) या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला महागात पडले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘पीटीआय’च्या या छायाचित्रावर आक्षेप घेतल्यानंतर ते छायाचित्र ‘पीटीआय’ने डिलिट केले. या छायाचित्रासाठी पीटीआयने स्मृती इराणींची माफीदेखील मागितली. मात्र मुखवटा घातलेल्या छायाचित्रात आक्षेपार्ह किंवा भावना कशा दुखावल्या जाऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे.

पीटीआयने रविवारी संध्याकाळी एक ट्विट केले होते. नितीश कुमार यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली होती. या बातमीचे ट्विट करताना ‘पीटीआय’ने नरेंद्र मोदी आणि नितीशकुमारांचा मुखवटा घातलेली मंडळी फ्रेंडशिप डे साजरा करतानाचा फोटो शेअर केला. मात्र हा फोटो माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींना फार काही रुचला नसावा. त्यांनी ट्विटरवरच ‘पीटीआय’ला झापले. जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांची तुम्ही अशी प्रतिमा निर्माण करणार का, ही तुमची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल त्यांनी विचारला. यानंतर ‘पीटीआय’ने भावना दुखावल्याबद्दल स्मृती इराणींची माफी मागितली आणि छायाचित्र डिलीट केले. मात्र यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. गौरव पांधी यांनी ‘पीटीआय’चे ते छायाचित्र पुन्हा ट्विट करत यात आक्षेपार्ह काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. स्मृती इराणी ‘पीटीआय’च्या कामात हस्तक्षेप का करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पीटीआयला यापूर्वीदेखील स्मृती इराणींची माफी मागावी लागली होती. मुसळधार पावसाने अहमदाबादचे सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात बुडाल्याचे आणि विमाने पाण्यावर तरंगत असल्याची ओळ देऊन ‘पीटीआय’ने अहमदाबाद विमानतळाची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. विश्वासार्ह वृत्तसंस्था असलेल्या ‘पीटीआय’ने हे छायाचित्र दिल्यामुळे देशातील अनेक नामवंत माध्यमांनी ती छायाचित्रे पहिल्या पानावर प्रसिद्ध केली. पण ती छायाचित्रे अहमदाबादमधील नसून २०१५ मधील चेन्नई विमानतळाची असल्याचे समोर आले होते. स्मृती इराणींनी ही चूक लक्षात आणून देताच पीटीआयला माफी मागावी लागली होती. तसेच छायाचित्र देणाऱ्या छायाचित्रकारालाही नोकरी गमवावी लागली होती.