छत्रपती शिवाजी महाराजांवरील ग्रंथाचे प्रकाशन येत्या १ मे रोजी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ग्रंथात काढण्यात आलेली शिवरायांची सर्वच्या सर्व म्हणजे १०० चित्रे ही पालघरमधील ब्रिजेश मोगरे या वनवासी चित्रकाराने काढली आहेत. येथील पार्लमेंटमधील ‘विन्स्टन चर्चिल सभागृहात’ हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.उदवेली बुक्स प्रकाशन संस्थेतर्फे आणि श्रीमहाराज सेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील तीन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या मालिकेतील, पहिला ग्रंथ येत्या १ मे रोजी प्रकाशित केला जाणार आहे. ठाणे जिल्ह्य़ातील पालघर येथील ब्रिजेश मोगरे या वनवासी तरुणाने काढलेल्या १०० शिवचित्रांचा या ग्रंथात समावेश आहे.

३८ वर्षीय मोगरे गेली १८ वर्षे ही चित्रे चितारत होते. पाश्चिमात्य देशांमध्ये स्वराज्य संस्थापकांची कीर्ती पुन्हा एकदा पोहोचविणे आणि त्यांचा गौरव करणे हेच यामागील उद्दिष्ट असल्याचे प्रकाशकांनी नमूद केले. सदर ग्रंथ ई-पुस्तक पद्धतीनेही उपलब्ध करून दिला जाणार असून सर्वच महत्त्वाच्या ग्रंथ विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर तो विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचे मूल्य भारतीय चलनात अवघे २५० रुपये तर परकीय चलनात अवघे तीन पौंड इतके ठेवण्यात आले आहे.