पुण्याचे भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारलेल्या एका प्रश्नामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही हसू आवरले नाही.
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये कायदा मंत्रालयाशी संबंधित प्रश्न सदस्यांकडून विचारले जात असताना अनिल शिरोळे यांनी न्यायालयातील प्रलंबित खटले रेल्वेतील तात्काळ तिकीटांप्रमाणेच जास्तीचे न्यायालयीन शुल्क आकारून वेगाने निकाली काढता येतील का, सरकार या बद्दल काही व्यवस्था तयार करू शकते का, अशा आशयाचा प्रश्न विचारला. त्याचा प्रश्न ऐकून सुमित्रा महाजन यांना हसू आले. रेल्वेतील तात्काळ तिकीट व्यवस्था आणि न्यायालयातील प्रलंबित खटले वेगाने निकाली काढणे यांची तुलना कशी काय करता येईल, असा प्रश्न पडल्याने त्यांना हसू आले. खटले वेगाने निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक) अस्तित्त्वात आहेत. त्यांच्या माध्यमातूनच या प्रश्नावर उत्तर शोधले जाऊ शकते. कायदा मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनीही आपल्या उत्तरात खटले वेगाने निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालयांचा उल्लेख केला. सुमित्रा महाजन यांनीही जलदगती न्यायालये आहेत, असा उल्लेख करीत पुढच्या सदस्याला प्रश्न विचारण्याची सूचना केली.