अटक टाळण्यासाठी हजारो महिला व लहान मुलांची ‘ढाल’ करीत आश्रमात लपलेला ६३ वर्षीय स्वयंघोषित संत रामपालने आपण पूर्णपणे निर्दोष असून काहीच चूकीचे केलेल नसल्याचा दावा केला आहे. तर, हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने रामपालचा जामीन रद्द करत दुपारी दोन वाजता न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
हरियाणा पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा मोठ्या शर्थीने बाबा रामपाल याला २००६ मधील हत्या प्रकरणी अटक केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी चंदीगडमधील सरकारी रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना माध्यमांसमोर रामपालने ‘मी निर्दोष असून मी काहीच गैर केले नाही’ असा कांगावा केला. दरम्यान, रामपालवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. रामपालला अटक झाली तेव्हा आश्रमात चार महिला संशयास्पदरित्या दगावलेल्या आढळल्या. दोन महिलांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला.
गेले काही दिवस रामपालला पकडण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना झुंजावे लागत होते. आश्रमातील महिला आणि लहान मुलांची मोठी संख्या लक्षात घेऊन कारवाईत संयम बाळगावा लागत होता. रामपालने १५ हजार भाविकांचा संरक्षक ढालीसारखा वापर करण्यासाठी आपल्या सशस्त्र गुंडांच्या जोरावर आश्रमातच रोखले होते, हेदेखील उघड झाले होते.