पंजाबमधील विधानसभेचे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. विधानसभा अध्यक्ष राणा केपी सिंग यांनी आप आमदारांवर निलंबनाची कारवाई करत सभागृहातून बाहेर काढले. विधानसभेतील मार्शल आमदारांना सभागृहाबाहेर नेत असताना झालेल्या धक्काबुक्कीमुळे वातावरण तापले होते. या घटनेदरम्यान आमदार सरबजीत मानुके या बेशुद्ध झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी काही आमदारही या घटनेत जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पंजाब विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून सरकारविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आप आमदार सुखपालसिंग खैहरा आणि लोक इंसाफ पक्षाचे सिमरजित सिंग बैंस यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या दोघांना विधानसभेत प्रवेश देऊ नये असे तोंडी आदेश विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना दिले होते. या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवताच आप आमदार आक्रमक झाले. विधानसभेच्या आतमध्ये आप आणि लोक इंसाफ पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरु करताच विधानसभा अध्यक्षांनी मार्शल यांना पाचारण केले आणि गोंधळी आमदारांनाही सभागृहाबाहेर काढण्याचे निर्देश दिले. यानंतर गोंधळी आमदारांना मार्शल्सनी फरफटत बाहेर नेले. यादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये आपचे काही आमदार जखमी झाले. तर आमदार सरबजीत मानुके या बेशुद्ध झाल्याने परिस्थिती बिकट झाली.

विशेष म्हणजे आप आमदारांवरील कारवाईदरम्यान विरोधकांमध्ये एकजूट दिसून आली. अकाली दलाच्या आमदारांनाही सभात्याग करत विधानसभेबाहेर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. आमदारांना विरोध करण्याचा अधिकार असून विधानसभा अध्यक्ष हुकूमशहाप्रमाणे वागत असल्याचा आरोप अकाली दलाने केला आहे.

विरोधी पक्षनेते आणि आपचे नेते एचएस फुलका यांनीदेखील सत्ताधारी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ‘आमदारांना शेतकऱ्यांचा प्रश्न मांडू दिला जात नाही. एकीकडे राहुल गांधी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जातात. पण पंजाबमध्ये त्याच पक्षाचे सरकार आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू देत नाही’ असा आरोप त्यांनी केला.