काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या एप्रिल महिन्यातील पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेतलेल्या शेतकऱ्याने वाढत्या नैराश्यापोटी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एप्रिल महिन्यात राहुल गांधी यांनी पंजाबमधील मंडईंना भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान, २८ एप्रिल रोजी फतेगड साहिब जिल्ह्यातील दादु माजरा गावामधील सुरजित सिंग या शेतकऱ्याने राहुल गांधींची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यावेळी सुरजित सिंग यांनी राहुल गांधींना लोकसभेत शेतकऱ्यांचा प्रश्नावर आवाज उठविण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही सुरजित यांच्या परिस्थितीत काही फरक पडला नव्हता. अखेर बुधवारी त्यांनी कर्जाच्या दडपणाखाली आणि दुबार पेरणी वाया गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली.
सूत्रांच्या माहितीनूसार, साठीच्या सुरजित सिंग यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. सिंग यांच्या मालकीची सहा एकर जमीन असून त्यांनी आणखी १९ एकर शेतजमीन भाडेपट्टीवर कसायला घेतली होती. मात्र, सलग दोन वेळा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे त्यांचे पीक वाया गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर तब्बल १३ लाखांचे कर्ज झाले होते आणि त्यांना स्वत:ची जमीन गहाण टाकावी लागली होती. त्यामुळेच राहुल गांधींच्या भेटीदरम्यान त्यांनी राहुल यांना पंजाबमधील शेतकऱ्यांच्या खालावलेल्या परिस्थितीबद्दल सांगितले होते. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई मिळाली नसून सरकार त्यांचा माल खरेदी करण्यासही नकार देत असल्याचे सुरजित यांनी राहुल यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे तुम्ही लोकसभेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा, असेही सुरजित यांनी राहुल गांधींना सांगितले होते. सुरजित सिंग यांच्यामागे त्यांचा मुलगा आणि तीन मुली असे कुटुंब आहे.