नरेंद्र मोदी हे युवकांचे आदर्श असल्याचा आव भारतीय जनता पक्षाचे नेते आणतात. प्रत्यक्षात भाजप व शिरोमणी अकाली दलाचे पंजाब सरकारमधील तीन मंत्री ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याची कबुली एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने दिली आहे. यावर भाजपचे नेते मूग गिळून का बसलेत, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी उपस्थित केला. ३१ डिसेंबरला पंजाबमधील मोंगा येथे मोदींची सभा होणार होती; परंतु या प्रकरणावरून निदर्शने होण्याची शक्यता असल्याने मोदींनी सभा रद्द केली, असा दावा शकील अहमद यांनी केला.
    शकील अहमद म्हणाले की, पंजाबच नव्हे तर देशभरातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या जगदीश भोला याने दिलेल्या कबुलीजबाबानुसार, पंजाब राज्य सरकारमधील तीन मंत्री हे रॅकेट चालवतात. विक्रम मजिठिया हेदेखील या प्रकरणात संशयित आहेत. परंतु उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप शकील अहमद यांनी केला. याची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालणार असल्याचे ते म्हणाले.