पाकिस्तानात निवडणूक सुधारणांच्या मागणीसाठी महामोर्चा आयोजित करणारे तेहरिक मिनहाज-उल-कुरान पक्षाचे अध्यक्ष आणि कट्टरपंथी ताहीर-उल-कादरी यांनी निवडणुकीत भाग घेण्यास नकार दिला आहे. तसेच आपल्या कुटुंबीयांपैकी कोणीही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानात मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हावी अशी मागणी करत कादरी यांनी गेल्याच आठवडय़ात पाकिस्तानात महामोर्चा आयोजित केला होता. तसेच संसदेसमोर धरणेही धरले होते. मात्र, त्यांनी आता अचानक आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानातील राजकारणात घराणेशाहीला प्रोत्साहन न देण्याच्या विचाराने प्रेरित होऊन आपण ही घोषणा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपली मुले, मुली, सुना व जावईही या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कादरी यांच्या या निर्णयावर राजकीय पक्षांनी टीका केली आहे. कादरींना कॅनडाचे नागरिकत्व टिकवायचे असल्याने ते निवडणूक लढवत नसल्याची टीका पक्षांनी केली आहे.