रेल्वेची प्रवासी क्षमता वाढवण्याचे प्रयत्न रेल्वेकडून केले जाणार आहेत. यासाठी डबल डेकर कोचची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेची प्रवासी क्षमता दुपटीने वाढणार आहे. शिवाय प्रतिक्षा यादीचा प्रश्नदेखील यामुळे संपुष्टात येणार आहे. रेल्वे प्रशासनाला नव्या रेल्वे सेवा सुरु करण्यात अडचणी येत आहेत. ही अडचण रेल्वे गाड्यांची क्षमता वाढवून सोडवता येऊ शकते. त्यामुळेच आता रेल्वे डबल डेकर कोचेसची निर्मिती करणार आहे.

रेल्वेयात्री या ऍपमधून गोळा झालेल्या माहितीनुसार, प्रत्येक दिवशी साधारणत: १० लाख लोकांना रेल्वेतून प्रवास करता येत नाही. तिकिटे उपलब्ध होत नसल्याने लोकांना रेल्वेमधून प्रवास करणे शक्य होत नाही.

‘जर आपण २,२०० प्रवाशांऐवजी ४,१०० प्रवाशांना स्टेशनवरुन रेल्वेने नेऊ शकलो, तर काय होईल याचा विचार करा. आपल्याला प्रतिक्षा यादी आणि त्यामुळे लोकांची होणारी अडचण या गोष्टी निकालात काढता येऊ शकतात,’ असे रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

लिंके हॉफमन बुश प्लॅटफॉर्मवर नव्या डेबल डेकर कोचेसची निर्मिती केली जाईल. वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित या दोन्ही प्रकारांमध्ये डबल डेकर कोचेसची निर्मिती केली जाणार आहे. सध्या एका कोचच्या निर्मितीसाठी अडीच कोटींचा खर्च येतो. डबल डेकर कोचच्या निर्मितीसाठी हा खर्च तीन ते साडेतीन कोटी इतका असेल.

या वर्षी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी २०२० पर्यंत प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रत्येकाला तिकीट मिळेल, असे म्हटले होते. यासाठी रेल्वे प्रशासनाने विकल्प नावाची सुविधा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रतिक्षा यादीतील प्रत्येकाला तिकीट मिळेल, याची सोय केली जाते.

‘आम्ही या डिझाईनची एक प्रतिकृती तयार करुन त्यासाठी अंतर्गत मंजुरी मिळवू. सध्या आम्ही यासाठी डिझाईन तयार करत आहोत. या प्रतिकृतीमध्ये आम्ही तांत्रिक अडचणी आणि इतर अडथळे सोडवू. याशिवाय या डबर डेकर रेल्वे गाड्या कोणत्या मार्गांवर धावतील, हेदेखील निश्चित करु. मार्ग निश्चिती झाल्यावर त्या मार्गांवर गाड्यांच्या चाचण्या घेतल्या जातील,’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारतीय रेल्वेमधून दरवर्षी ७ अब्ज लोक प्रवासी करतात. यातील १ कोटी ३० लाख लोक दररोज रेल्वेतून प्रवास करतात. तर दररोज साधारणत: १ कोटी २० लोकांना तिकीट मिळत नाही.

‘आम्ही उत्सव काळात २४ च्या ऐवजी फक्त १२ रेल्वे गाड्या सुरू ठेऊ. त्यामुळे रेल्वे मार्गिकांवरील वाहतुकीचा भार कमी होईल. यामुळे रेल्वे गाड्यांची क्षमता जवळपास १.६ ते १.७ पटीने वाढेल. यातील एक-चतुर्थांश आसने रिकामी राहिली तरीही आम्हाला नुकसान होणार नाही. कारण आम्ही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणार आहोत. यामुळे जेव्हा मागणी असेल तेव्हा आम्ही लोकांना आसने उपलब्ध करुन देऊ शकू,’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.