पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीसमोर ताहिर-उल-कादरी यांच्या ‘पाकिस्तान अवामी तहरिक’ या पक्षाच्या रूपाने नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. सरकारने निवडणूक पद्धतीत बदल करावा, या मागणीसाठी देशाच्या राजधानीत घुसलेल्या या पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये कमालीची धुमश्चक्री झाल्याने पाकिस्तानमधील राजकीय वातावरण मंगळवारी ढवळून निघाले. या हिंसक कार्यकर्त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या, तसेच हवेत गोळीबारही करावा लागला.
गेली सात वर्षे कॅनडामध्ये स्थायिक असणारे कादरी हे काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानात परतले असून त्यांनी नव्याने पक्षाची संघटनात्मक बांधणी केली आहे. या पक्षाच्या प्रसिद्धीसाठी प्रमुख वृत्तपत्रात दिलेल्या लाखो रुपयांच्या जाहिरातींमुळे ते प्रथम चर्चेत आले. यानंतर २४ डिसेंबरला लाहोर येथे घेतलेल्या एका मेळाव्यात त्यांनी निवडणूक पद्धतीत बदल करण्याची मागणी सरकारकडे केली व त्यासाठी १० जानेवारीपर्यंतची मुदत दिली. सरकारने ही मागणी मान्य न केल्यास आपल्या पक्षाचे कार्यकर्ते १४ जानेवारीला राजधानीतील जीना अ‍ॅव्हेन्यूमध्ये घुसतील, असा इशारा त्यांनी दिला होता. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करू, असे आश्वासन त्यांनी सरकारला दिले होते, परंतु पोलिसांना चकमा देत त्यांचे शेकडो कार्यकर्ते मंगळवारी येथे जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सरकारी इमारतीत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रथम अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या, मात्र या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
कादरी हे विदेशी शत्रूंचे हस्तक असून केवळ राजकीय स्वार्थासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.
कोण आहेत कादरी?
सुफी विचारसरणीचे विद्वान आणि लोकशाहीसाठी लढणारे कादरी यांनी २५ मे १९८९ मध्ये ‘पाकिस्तानी अवामी तहरिक’ पक्षाची स्थापना केली होती. सरकारी भ्रष्टाचार, मानवी हक्क, महिलांचे प्रश्न या मुद्दय़ांवर त्यांनी सातत्याने कार्य केले. लाहोरमधून ते पाकिस्तानी संसदेवर निवडूनही गेले होते. २००४ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते कॅनडात गेले. जानेवारी २०१३ मध्ये मायदेशी परतल्यावर त्यांनी राजकीय चळवळीत पुन्हा उडी घेतली आहे. दहशतवाद हा इस्लामविरोधी कसा आहे, हे सांगणारा त्यांचा ६०० पानी फतवा जगप्रसिद्ध आहे.