अभिनेता शाहरुख खान याच्या ‘रा.वन’ चित्रपटाच्या अॅनिमेशन टीमला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या चारु खंडालचे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झाले. २०१२ मध्ये झालेल्या अपघातामधून बचावलेल्या चारुने बुधवारी जयपूरमध्ये राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. २५ मार्च २०१२ मध्ये चारु तिची बहिण आणि मित्र विक्रांत गोयल यांच्यासोबत रिक्षातून घरी परतत असताना अपघात घडला होता. ‘रा.वन’ चित्रपटातील अॅनिमेशन इफेक्टसाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचे सेलिब्रेशन करुन ती घरी येत होती.

मुंबईतील ओशीवारामध्ये घडलेल्या या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.  अपघातानंतर तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ चारुवर रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघातामध्ये तिला डोके आणि मणक्याला जोरदार मार लागला होता. तीन महिन्याहून अधिक काळ तिच्यावर रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचारामध्ये ४० तिच्यावर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.  या काळात तिच्यावर अनेक शस्रक्रियाही झाल्या. उपचारादरम्यान तिला पक्षघाताचा झटकाही आला होता. अपघातापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत ती औषधावर अवलंबून होती.

शाहरूख खानचा महत्त्वाकांक्षी व बहुचर्चित चित्रपट ‘रा.वन’ २६ आक्टोबर २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. देशभरात तसेच देशाबाहेर तब्बल पाच हजार स्क्रीन्समध्ये हा चित्रपट झळकला होता.  तब्बल २०० कोटी रुपयांच्या आसपास बजेट असलेला हा बॉलीवूडच्या  बिग बजेट चित्रपटापैकी एक ठरला होता. देशातच नव्हे तर इंग्लंड, दुबई, जर्मनी इत्यादी देशांमध्येही मोठय़ा प्रमाणावर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.  ‘रा.वन’ची जोरदार प्रसिद्धी, त्यात वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि थ्रीडी तसेच टूडी अशा दोन्ही प्रकारांची चांगलीच चर्चा रंगली होती.