गेल्या आठवडय़ात ८८ लाख हेक्टरची भर; एकूण लागवड ४.१५ कोटी हेक्टरवर

नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका रब्बी लागवडीवर होण्याची भीती दूर सारताना बळीराजाने आतापर्यंत ४ कोटी १५ लाख हेक्टरवर पेरण्या केल्या आहेत. यामध्ये मागील एका आठवडय़ामध्ये जवळपास ८८ लाख हेक्टरची भर पडली. मागील वर्षी याच कालावधीत ३ कोटी ८२ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

केंद्रीय कृषिमंत्रालयाने २ डिसेंबपर्यंतची रब्बीच्या लागवडीचे आकडे शुक्रवारी प्रकाशित केले. त्यानुसार गव्हाचे क्षेत्र १ कोटी ७३ लाख हेक्टरइतके आहे. २५ नोव्हेंबरला ते १ कोटी २७ लाख हेक्टरइतके होते. म्हणजे सुमारे ४५ लाख हेक्टरची भर पडली. डाळींचीही लागवड ९५ लाख हेक्टरवरून थेट १ कोटी १२ लाख हेक्टरवर पोचली. तेलबियांचे प्रमाण ६४ लाखांहून सुमारे ७१ लाख हेक्टरवर पोचले. भात लागवडीचे प्रमाण तर मागील एका आठवडय़ात दुपटीने (६.८२ लाखांहून थेट १३.३७ लाख हेक्टरवर) वाढले. परिणामी २ डिसेंबपर्यंत ४ कोटी १५ लाख ५३ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत.

नोटाबंदीने ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याने रब्बीच्या पेरण्यांना मोठा फटका बसण्याची भीती होती, मात्र तसे काही घडल्याचे दिसत नाही. किंबहुना, आठ नोव्हेंबरनंतरच्या सुमारे चार आठवडय़ांमध्ये पेरण्यांमध्ये तब्बल २ कोटी ७० लाख हेक्टरची भर पडल्याची आकडेवारी सांगते.

नोटाबंदीनंतरच्या पेरण्या (क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • ११ नोव्हेंबर – १ कोटी ४६ लाख
  • १८ नोव्हेंबर – २ कोटी ४१ लाख
  • २५ नोव्हेंबर – ३ कोटी २७ लाख
  • २ डिसेंबर – ४ कोटी १५ लाख