भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराज राजन यांना एकेकाळी डेप्युटी गव्हर्नर पदाची ऑफर देण्यात आली होती. विशेष म्हणजे राजन यांनी तेव्हा ती ऑफर नाकारली पण दशकभरानंतर मात्र त्यांनी थेट गव्हर्नर पदाची धुरा सांभाळली. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय.व्ही.रेड्डी यांनीचा हा खुलासा केला आहे.

रेड्डी यांनी आपल्या ‘अॅडव्हाइस अँड डिसेंट: माय लाइफ इन पब्लिक सर्व्हिस’ या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. रेड्डी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की, ऑक्टोबर २००४ मध्ये राकेश मोहन यांना आर्थिक प्रकरणांचे सचिव बनवण्यात आले होते. तेव्हा आम्ही त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेत होतो. मी त्यावेही रघुराम राजन यांना डेप्युटी गव्हर्नर पद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. ते मला मुंबईत भेटण्यासाठीही आले होते. या प्रस्तावावर विचार करण्यासाठीही ते तयार झाले होते. परंतु, अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी नकार कळवला.

रेड्डी पुढे लिहितात, मी त्यांना समजवलं की रिझर्व्ह बँकेला त्यांच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. देशाला त्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल. त्यावेळी राजन यांनी सकारात्मकताही दाखवल्याचे त्यांनी म्हटले. पण नंतर राजन यांनी आपला निर्णय बदलत नकार कळवल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राजन यांनी गव्हर्नरपदी असताना गतवर्षी  वेतन आणि भत्त्यांमुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये व्यवस्थापनाच्या सर्वोच्च स्थानी प्रतिभावान लोक येत नसल्याची खंत व्यक्त केली होती.