राहुल गांधी यांचा आरोप; हैदराबादमध्ये आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांसमवेत उपोषणात सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा.स्व. संघ हे ‘वरून एक विचारसरणी लादून’ विद्यार्थ्यांच्या भावना दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. रोहित वेमुलाच्या आत्महत्येची तुलना त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येशी केली. गांधीजींना सांगायचे असलेले सत्य त्यांनी बोलू नये अशी इच्छा असलेल्या लोकांनी त्यांची हत्या केली होती. याच लोकांनी संस्थेतील सत्य सांगू इच्छिणाऱ्या रोहितला आत्महत्येसाठी भाग पाडले आहे, असे ते म्हणाले.
हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांच्यासोबत एक दिवसाचे उपोषण केले. या कृतीबद्दल भाजपने राहुल यांच्यावर कडक टीका केली असून ते या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला याने शनिवारी वयाची २७ वर्षे पूर्ण केली असती. त्याचा ‘वाढदिवस’ साजरा करण्यासाठी सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीनंतर केलेल्या प्रार्थनेत राहुल गांधी सहभागी झाले. शनिवारी ते पुन्हा आंदोलनस्थळी आले आणि उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले.

अभाविपतर्फे ‘महाविद्यालये बंद’
राहुल गांधी यांनी शनिवारी हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठाला दिलेल्या भेटीविरुद्ध निदर्शने करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी तेलंगणात ‘महाविद्यालये बंद’चे आवाहन केले. राहुल गांधी हे हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठातील ‘मृतदेहांवरून राजकारण’ करत असल्याच्या निषेधार्थ अभाविपने तेलंगणातील सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. विद्यापीठात शांततेचे वातावरण पुनस्र्थापित होत असताना राहुल गांधी या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कदियाम राजू म्हणाले.