देशात आजही दलितांचे हक्क हिरावले जात असून जातीयवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न अद्याप अपूर्णच असल्याचे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ असलेल्या मध्यप्रदेशच्या महू येथील जाहीर सभेत ते बोलत होते. देशात आजही दलितांवर अन्याय करणाऱया जातीयवादी शक्ती अस्तित्त्वात आहेत. जातीयवादी शक्तींविरोधात लढणे हे सोपे नसल्याची कल्पना त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनाही होती तरीही त्यांनी प्रखरतेने जातीयवादाविरोधातील आपला लढा सुरूच ठेवला. आज आपल्यालाही जातीयवादाविरोधात असाच प्रखर लढा सुरू ठेवण्याची गरज निर्माण झाली असून बदल तातडीने होत नाही हे बाबासाहेबांनी अनुभवलं, त्याविरोधात त्यांनी सातत्याने लढा दिला, आम्हीही जातीवादाविरोधात लढा उभारू, असे राहुल यावेळी म्हणाले. जातीमुक्त समाजाची निर्मिती करणे, हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही ते पुढे म्हणाले. गेल्या वर्षभरात समोर आलेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनांचा आधार घेत राहुल यांनी देशात जातीयवादी शक्तींचे पेव दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. दलित विद्यार्थी संघटनेवर घातलेली बंदी अन्यायकारक असून काँग्रेस त्याविरोधात आवाज उठवत राहणार असल्याचेही राहुल म्हणाले.