काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये आघाडी झाली आणि ट्विटरकरांसाठी ती मेजवानीच ठरली. गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होणार याची चर्चा होती. त्यानंतर ती आघाडी झाली म्हणून सध्या चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे एकत्र आल्यानंतर निवडणुकीचा काय निकाल लागेल याची गरमागरम चर्चा ट्विटरवर सुरू झाली आहे. या दोन्ही पक्षांची आघाडी कशी सुरू झाली त्यावरुन ट्विटरवर गमती-जमतीचे सत्र सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. काही जणांचे म्हणणे आहे की राहुल गांधींनी निवडणूक होईपर्यंत न बोलण्याच्या अटीवर काँग्रेसला समाजवादीने १०५ जागा देण्याचे ठरवले आहे.

काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे १३३ जागा मागितल्या होत्या. ही मागणी समाजवादी पक्षाने अमान्य केली. समाजवादीने काँग्रेसला ९९ जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यांच्यामध्ये बोलणी झाल्यावर काँग्रेसला ६ जागा वाढवून देण्यात आल्या. त्यांच्यामध्ये ही बोलणी कशी झाली असेल याच्यावर देखील गमतीशीर ट्विट करण्यात आले आहेत. ज्या पक्षाला पूर्ण देशात लोकसभेत ५० जागा मिळवता आल्या नाहीत त्या पक्षाला विधानसभेसाठी बऱ्याच जागा देण्याचे धाडस समाजवादीने केल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. काँग्रेसने १०५ जागा स्वतःकडे ठेवल्या आणि इतर जागा समाजवादीला दिल्या असा खोचक टोलादेखील काही जणांनी लावला आहे. काँग्रेस हा दानशूर पक्ष असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे.