आसाममध्ये भाजपचे आव्हान असतानाही पुन्हा सत्ता काबीज करण्याचा काँग्रेसचा उद्देश आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या सोमवारी आसाम दौऱ्यावर येणार आहेत.
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या जोरहाट या मतदारसंघात राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहे.
राहुल गांधी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात सोनितपूर जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजर राहणार असून लखीमपूर जिल्ह्य़ात १५ फेब्रुवारी रोजी महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीलाही हजर राहणार आहेत. शिवसागर जिल्ह्य़ात राहुल गांधी यांची पदयात्राही आयोजित करण्यात आली आहे.
भाजपने केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून केली आहे.