भारत आणि चीन यांनी निवडलेले मार्ग वेगवेगळे असले तरी या दोन्ही देशांची भविष्यातील कामगिरी जगाच्या अर्थकारणाची नवी दिशा निश्चित करेल, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. ते बुधवारी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात बोलत होते.

सध्याच्या घडीला जगात दोन मोठी स्थित्यंतरं घडत आहेत. यापैकी एक पूर्णपणे मुक्त आहे तर दुसरे नियंत्रित आहे. दोन्ही व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारे घटनांना प्रतिसाद देत आहेत. भारत आणि चीन हे अतिप्रचंड देश आहेत. दोन्ही देश कृषीप्रधानतकेडून शहरीकरणाच्या नव्या प्रारूपाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जगातील एकूण लोकसंख्येपैकी मोठा हिस्सा या दोन देशांमध्ये एकटवलेला आहे. त्यामुळेच या दोन देशांची भविष्यातील कामगिरी जगाची मुलभूत रचना बदलण्यास कारणीभूत ठरेल. चीनने लोकशाही पद्धतीचा स्वीकार करावा किंवा नाही, हे बोलण्यासाठी हे उचित व्यासपीठ नाही. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे आणि भारताने स्वत:चा मार्ग निवडला आहे. मात्र, या दोन देशांमध्ये सहकार्य़ आणि स्पर्धा निर्माण होणे, क्रमप्राप्त आहे. त्यादृष्टीने आपल्याला रोजगारांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आपल्याला प्राथमिक पातळीवर चीनशी स्पर्धा करावी लागेल. मात्र, भारत तसे करण्यात अपयशी ठरत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारपुढे अप्रत्यक्षपणे काही प्रश्न उपस्थित केले. भारताकडे चीनसारखी दूरदृष्टी आहे का? असेल तर ते कशा प्रकारचे आहे? भविष्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याचे नाते कोणत्या पातळीवर असेल? या मुलभूत प्रश्नांची उत्तरे भविष्यात महत्त्वाची ठरणार आहेत. मात्र, सध्याच्या घडीला चीन पूर्ण ताकदीने पुढे जात आहे, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. आपल्यालाही त्यासाठी काम केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.