मोदींवर बरसताना राहुल गांधींची महाआघाडीसाठी साद; ‘हिटलरच्या पराभवाची शरद यादवांना खात्री 

देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटल्यास भाजप कोठेही दिसणार नसल्याचा ठाम दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राजधानीमध्ये केला. त्यांचीच री ओढताना संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांनीही एकजूट झाल्यास ‘हिटलर’चा पाडाव सहज शक्य असल्याचे नमूद केले.

राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापासून सीताराम येचुरी, डी. राजा, डॉ. फारूख अब्दुल्ला, भाजपच्या नाकावर टिच्चून राज्यसभेत विजयी झालेले अहमद पटेल आदी डझनाहून अधिक नेत्यांच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलेच लक्ष्य केले गेले. भाजपबरोबर हातमिळवणी करण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निर्णयाविरुद्ध बंड पुकारलेल्या शरद यादव यांनी ‘देशाची संस्कृती वाचविण्या’च्या निमित्ताने विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गुजरात राज्यसभा निवडणुकीत दोन्ही मते भाजपला देणाऱ्या आणि नंतर सोनिया गांधी यांच्याकडील विरोधी पक्षांच्या बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही उपस्थिती या परिषदेत होते. तसेच आपल्या निर्णायक मताने अहमद पटेलांना विजयी करणारे संयुक्त जनता दलाचे गुजरातमधील एकमेव आमदार छोटूभाई वसावा हे सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रस्थानी होते.

या वेळी राहुल यांनी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. ‘स्वच्छ भारता’ची भाषा मोदी करतात; पण आम्हाला ‘सच भारत’ हवा आहे. मोदी म्हणतात, ‘मेक इन इंडिया’; पण भारतात सगळीकडे ‘मेड इन चायना’चा माल आहे. सत्य हे आहे, की ‘मेक इन इंडिया’ पूर्णपणे अपयशी ठरले आहे. माध्यमे, न्यायालये आणि देशाच्या सर्वच संस्थांमध्ये संघ आपली माणसे घुसवीत आहे. आपल्या विचारसरणीच्या आधारावर निवडणुका जिंकत नसल्याचे संघाला चांगलेच माहीत असल्याने देशाचे तुकडे पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सत्तेवर येईपर्यंत त्यांनी कधी तिरंग्याला सलाम ठोकला नाही आणि आम्हाला देशभक्ती शिकवितात. हा देश आमचा आहे, असे संघ म्हणतो आणि आम्ही देशाचे आहोत, असे काँग्रेस म्हणतो. भाजपवाले देशाला लुटणारे आहेत आणि आम्ही देशाला काही तरी देणारे आहोत. दोघांमध्ये हाच फरक आहे. म्हणून त्यांना उलथून टाकण्यासाठी विरोधकांनी एकत्र आले पाहिजे. महाआघाडी झाल्यास मी खात्रीने सांगतो, की भाजप तुम्हाला कोठेही दिसणार नाही.’’

पाक, चीनपासून नव्हे, तर देशातूनच धोका

देशाला पाकिस्तान आणि चीनपासून नव्हे, तर देशातील चोरापासून धोका आहे. त्यांच्यामुळे देशातील सारे वातावरण नासून गेले असल्याची टीका जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याला भाजपने आक्षेप घेतला आणि माजी मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तीला असले लाजिरवाणे बोलणे शोभत नसल्याचे म्हटले.सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर बोलत असताना डॉ. अब्दुल्ला म्हणाले, ‘‘पाकिस्तान व चीनला आपण तोंड देऊ  शकतो. पण दुर्दैवाने खरा धोका बाह्य़शक्तींपासून नव्हे, तर देशांतर्गत आहे. देशामध्ये एक चोर बसला आहे आणि तो सर्वकाही नासवून टाकत आहे.’’ काश्मिरींच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका घेण्याने तीळपापड झालेले अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘‘आमच्या राष्ट्रीयत्वावर शंका घेणारे ते कोण? त्यांना कुणी अधिकार दिला? फाळणीनंतर आम्ही काश्मिरींनी पाकिस्तानऐवजी भारताला निवडले. कारण भारताने समानतेची खात्री दिली. भारतीय मुस्लीम असल्याचे मी अभिमानाने सांगतो. भारत जोडोची भाषा ते फक्त भाषणातच करतात; पण प्रत्यक्ष कृती मात्र उफराटी आहे.’’

सर्वाना समान धाग्यात बांधणारी देशाची संस्कृती जपायची असेल तर शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली मोहीम चालू केल्याशिवाय पर्याय नाही. संस्कृती वाचविण्याचे काम त्यांनाच हाती घ्यावे लागेल. नाही तर भारताला ‘हिंदू राष्ट्रा’त बदलल्याशिवाय भाजप थांबणार नाही.  सीताराम येचुरी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट सरचिटणीस

शरद यादवांचा गटच खरा संयुक्त जनता दल आहे. केंद्रीय मंत्रिपद नाकारून त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची गरज आहे..   गुलाम नबी आझाद, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते

भारतीय संस्कृतीच्या गप्पा ही मंडळी मारत आहेत. केरळमध्ये डाव्यांचे गुंड संघ स्वयंसेवकांची हत्या करीत असताना कुठे गेले यांचे हे संस्कृतिप्रेम? ‘पुरस्कारवापसी गँग’ आहे तरी कुठे? ही महाआघाडी म्हणजे मोदींना घाबरलेल्या व भ्रष्टाचारविरोधी कारवाईने काकुळतीला आलेल्यांचा गट आहे. जनता त्यांना ओळखून चुकली आहे.   रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री