राहुल गांधी यांचे मोदींना प्रत्युत्तर; विकासकामे करण्याचा सल्ला
पंतप्रधानांनी कारणे सांगण्यापेक्षा देश चालवावा असे प्रत्युत्तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. आसाममधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कुटुंब संसदेला वेठीस धरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राहुल यांनी उत्तर दिले.
अर्थव्यवस्था अजून १८ महिन्यांत रुळावर आलेली नाही. शेतकऱ्यांना योग्य दाम मिळत नाही, कामगारांचे प्रश्न आहेत. मात्र पंतप्रधान केवळ कारणे सांगत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. देशवासीयांनी कारणे सांगण्यासाठी नव्हे तर काम करण्यासाठी निवडून दिले आहे असे राहुल यांनी मोदींना सुनावले. सरकार काम करत नसल्याची तक्रार गरीब, कामगार व शेतकरी करत होते, मात्र आता उद्योजकही तक्रार करू लागल्याचा टोला राहुल यांनी लगावला. मोदी आमच्यासाठी सरकार चालवत असले तरी आमचे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत, असे अनेक बडे उद्योजक तक्रार करत असल्याचे राहुल यांनी सांगितले. सरकार केवळ तीन ते चार भांडवलदार मित्रांसाठी काम करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.
या महिन्यात १० वर्षे पूर्ण केलेल्या मनरेगा योजनेच्या मुद्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेतल्यानंतर राहुल पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यांतील मनरेगासारख्या योजना आणि वनाधिकार कायद्यांचे कसे उल्लंघन करत आहेत, याबद्दल या नेत्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसने गरिबांसाठी सुरू केलेल्या योजनाही भाजप कशा पुढे नेत नाहीत असा आरोप केला.