राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटणारी असून ही घातक विचारधारा देशावर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसप्रणीत ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात गुरुवारी केली.
शेतकऱ्यांपासून कपडय़ांपर्यंत या देशात केवळ एकाच माणसाला सारे काही कळते, ही वृत्ती ही याच विचारधारेतून आली आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
मेळाव्यात आल्यावर उत्साही कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे व्यासपीठावर पोहोचण्यास राहुल यांना दहा मिनिटे लागली. त्याचा संदर्भ देत राहुल म्हणाले की हेच काँग्रेसची जिवंत संस्कृती आहे. याउलट संघाच्या शाखेत सारे काही शिस्तबद्ध असते. तिथे स्वतंत्र विचार करण्याची व्यक्तिची क्षमताच मारली जाते. सारे एका रांगेत असतात. रांग मोडली तरी दांडुका मारला जातो! आम्ही एकत्र येतो आणि चर्चेने निर्णयावर येतो. संघ किंवा भाजपात सगळ्याच गोष्टींबद्दल एकाच माणसाला माहिती असते आणि एकाचेच ऐकण्यापुरतेच सर्व एकत्र जमतात.
चर्चेला किंवा विचारांच्या आदानप्रदानाला संघाची परवानगीच नसते. शिस्तीच्या नावाखाली व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी दिला जात आहे. देशातील अंतर्गत संवाद आणि वैचारिक आदान-प्रदानच हरवले आहे. आधी त्यांनी आपल्या संघटनेतले विचार स्वातंत्र्य नष्ट केले आता ते देशातील बहुधर्मीय, बहुजातीय समाजातील विचार स्वातंत्र्य नष्ट करू पाहात आहेत, अशी जोरदार टीकाही गांधी यांनी केली.
मनमोहन सिंग यांच्याकडून मोदींची ‘पाठशाळा’
अर्थकारणाच्या गंभीर स्थितीबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी मोदी यांच्यावर जाहीर ताशेरे ओढले होते. त्यानंतर सायंकाळी मोदी यांच्या आग्रहावरून ते त्यांच्या भेटीला गेले. या भेटीत त्यांनी मोदी यांची आर्थिक विकासाबाबत ‘पाठशाळा’च घेतली, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.

शिक्षण हे विकासाचे साधन आहे, अशी भाषा मोदी करीत होते. प्रत्यक्षात संघाने शिक्षण मंत्रालयावरच कब्जा केला आहे. आयआयटी आणि आयआयएमला पूर्वी बिनीचे शास्त्रज्ञ सल्ला देत, आता तेही त्यासाठी उत्सुक नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी युवकांनीच आता संघर्ष केला पाहिजे.
राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष