केंद्र सरकारमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेच चालते. त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांवर खोटे आरोप लावले जातात, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केली.
काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी ‘लोकतंत्र बचाओ’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी लोकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवण्यात आले होते. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ असे आश्वासन मोदींनी दिले होते. पण गेल्या दोन वर्षात केवळ १.३० लाख युवकांनाच रोजगार मिळाला आहे. राज्यातील ४० टक्के भाग दुष्काळाने होरपळतो आहे. रोज देशातील सरासरी ५० शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण याबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत.
काही राज्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दलितांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आपण आतापर्यंत गरिबांसाठी लढत आलो आहोत आणि पुढील काळातही लढत राहणार, असेही राहुल गांधी म्हणाले.