काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास केवळ सामान्य लोकांनाच होत असून फक्त मोजक्या बड्या धेंड्यांनाच याचा फायदा होत असल्याचे ते म्हणाले. विजय मल्ल्या हे भारताचे चोर आहेत. त्यांना १२०० कोटी रूपयांचे चॉकलेट का खाऊ घातले ? त्यांचं कर्ज का माफ केलं, असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींना विचारला. उद्योगपतींना कर्ज माफ करण्याच्या धोरणावर त्यांनी टीका केली.

कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी शंका व्यक्त केली. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी सप्टेंबर मिहन्यात सर्वात जास्त काळा पैसा बँकेत कसा जमा झाला, असा सवाल विचारत सरकारने आपल्या जवळच्या लोकांना या निर्णयाची माहिती दिल्याचा आरोप केला.
मोदींनी शेतकऱ्यांची आणि मनरेगा योजनेची खिल्ली उडवल्याचे त्यांनी म्हटले. मनरेगात फक्त खड्डे खोदले जातात, असे वक्तव्य करून मोदींनी शेतकऱ्यांना अपमानित केल्याचे म्हटले.
दरम्यान, शुक्रवारी पणजी येथील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली होती. मोदी सरकारने देशातील एक टक्के लोकांकडे ६० टक्के धन पोहोचवले असल्याचा आरोप केला.