जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने करण्यात येणाऱ्या हल्ल्यातील पीडितांची काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली. सीमारेषेवरील नागरिकांचे पुनर्वसन करण्याबरोबरच सरकारने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राहुल यांनी या वेळी केली आहे.
पाकिस्तानने सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. स्वातंत्र्यदिनी करण्यात आलेल्या हल्ल्यात एका शिक्षकासह तीन जण ठार झाले असून त्यांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी चौकशी केली. या वेळी राहुल यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. राहुल यांनी अंबिका सोनी आणि जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांच्यासह या हल्ल्यात ठार झालेले सरपंच करामत हुसेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेताना मदतीचे आश्वासन दिले. शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सातत्याने नुकसान सोसावे लागत असलेल्या भागातील नागरिकांसाठी केंद्राने पुनर्वसन कार्यक्रम राबवावा तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करावी, अशी आग्रही मागणी राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी म्हणाले की, येथील नागरिक सातत्याने भीतीच्या वातावरणात जगत आहेत. त्यांच्या सर्व मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात. अशा हल्ल्यात व्यक्ती ठार झाल्यात त्यांना त्वरित भरपाई देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.