भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादात अडकलेल्या राहुल गांधी यांनी न्यायालयात घुमजाव केले होते. त्यांच्या या भुमिकेचा समाचार घेत स्वामी यांनी ऐतिहासिक राजकीय परंपरा असलेल्या काँग्रेसच्या भवितव्यासाठी राहुल यांनी राजकारणाचा त्याग करावा, असा सल्ला दिला आहे.
‘राहुल यांनी न्यायालयात यु टर्न घेऊन आपला भ्याडपणा दाखवून दिला आहे. माझ्या मते त्यांना काहीच राजकीय भविष्य नाही. काँग्रेसच्या भवितव्यासाठी त्यांनी राजकारण सोडावे. आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करण्याचे ट्विट त्यांनी केले नसावे. कदाचित त्यांच्या कार्यालयातील एखाद्याने ते ट्विट केले असावे,’ असे स्वामी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य महाराष्ट्रातील एका निवडणूक सभेत केले होते. त्यांच्याविरोधात एकाने संघाची बदनामी केल्याचा खटला दाखल केला होता. सुनावणीवेळी राहुल गांधी यांनी आपण संघाला नव्हे तर संघाशी संबंधित व्यक्तीने हे कृत्य केल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले होते. त्यानंतर गुरूवारी त्यांनी पुन्हा एक ट्विट करून संघाबाबतच्या आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले होते.
याविषयी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्या. आर. एस नरिमन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जर याचिकाकर्त्यांचे राहुल गांधींच्या स्पष्टीकरणावरून समाधान झाले असेल, तर न्यायालय हा खटला रद्द करू शकते, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील यू. आर. ललित यांना सांगितले. याचिकाकर्त्यांची बाजू मांडावी, असेही न्यायालयाने सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी होणार आहे.