मनभेदबाजूला ठेवून राहुल गांधी यांनी पटेलांवर गुजरात विधानसभेची संपूर्ण सूत्रे सोपविली

‘‘राज्यसभा निवडणुकीत तुम्ही भाजप अध्यक्ष अमित शहांच्या नाकावर टिच्चून विजय मिळविलात. आता तशीच कामगिरी विधानसभा निवडणुकीतही करा. भाजपला हरविण्याचे शिवधनुष्य स्वीकारा..,’’ असे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधींचे प्रभावशाली राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे गुजरात विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमित शहाविरुद्ध अहमद पटेल या राजकीय व्यवस्थापनातील दोन धुरीणांमधील संघर्षांचा भाग दोन गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

गुजरात निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये पटेलांना मानाचे पान देण्याची अधिकृत घोषणाच राहुल यांनी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये केली. पटेल यांच्याबरोबर असलेल्या कथित मतभेदांच्या पाश्र्वभूमीवर राहुल यांच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. तीनदा लोकसभा खासदार व पाचव्यांदा राज्यसभेवर गेलेल्या पटेल यांचाच गुजरात काँग्रेसमध्ये अंतिम शब्द असायचा, सर्व प्यादे तेच हलवायचे आणि निवडणुकीची सूत्रे त्यांच्याकडेच असायची. पण डिसेंबर २०१७ मध्ये होणार असलेल्या यंदाच्या निवडणुकीपासून राहुल यांनी पटेलांना बऱ्यापैकी दूर ठेवले होते. मात्र, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये अहमद पटेलांनी विजय मिळविला आणि ‘बाजीगर’ म्हणून आपली प्रतिष्ठा टिकविली.

त्या पाश्र्वभूमीवर गुजरात निवडणुकीच्या तयारीसाठी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये राहुल यांनी पटेलांचे ‘महत्त्व’ अप्रत्यक्षपणे कबूल केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘राज्यसभा जिंकून तुम्ही शहांना मात दिलीच आहे. आता आणखी जबाबदारी घ्या आणि अशाच पद्धतीने गुजरात विधानसभा निवडणूकसुद्धा जिंकून दाखवा,’’ असे राहुल म्हणाले. ‘‘नाही तरी नरेंद्र मोदी व अमित शहांना तुमच्याइतके चांगले कुणी ओळखत नाही,’’ असेही ते म्हणाल्याचे समजते.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत, सहप्रभारी व हिंगोलीचे खासदार राजीव सातव, वर्षां गायकवाड आणि आमदार हर्षवर्धन सपकाळ आदी उपस्थित होते. रणनीतीवर अंतिम हात फिरवण्यासाठी ही बैठक होती आणि त्यात पटेलांना पूर्वीसारखे महत्त्व दिले गेल्याचे समजते.

पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर सोनियांच्या जवळ असणाऱ्या ‘म्हाताऱ्या अर्का’ना जरा दूर ठेवण्याचे धोरण राहुल यांनी अवलंबिले आहे. त्यातूनच सोनियांच्या अत्यंत निकटतम असलेल्या अहमद पटेलांना निर्णयप्रक्रियेतून जवळपास बाजूलाच केले होते. तसे खुद्द स्वत: पटेलही सूचित करायचे. दोघांमधील ‘मनभेद’ एवढे होते की, सर्व आयुधानिशी शहा चालून आले असतानाही मिळविलेल्या विजयाबद्दल पटेलांचे राहुल यांनी साधे अभिनंदनदेखील केले नव्हते. किंबहुना पटेलांची बाजू मांडण्यासाठी काँग्रेस जिवाच्या आकांताने लढत असताना राहुल पडद्यावर कोठेच नव्हते. ते तापाने फणफणल्याचे सांगितले जात होते.